चांदण्यातल्या भेटीगाठी

आज पाहता तुज मनसुमन हे मोहरले
चांदणे जसे हे पृथ्वीवरी अवतरले...
भासे तुझे ते रूप अतीव मनोहर
नयन पाचूं वर पापण्यांची मृदू झालर
अन गाली मंद स्मिताचा तो अखंड निर्झर
एकाच रूपी जणू अवघे स्वप्न नगर वसले
चांदणे जसे हे पृथ्वीवरी अवतरले
उमगले मन हे निरागस सदा निर्मळ
अलगद उमलले जेव्हा ओठिचे ते कमळ
स्वरवृष्टी जाहली ती अपूर्व मंजुळ
कोमल स्पर्शाने तव पुष्पही लाजले
चांदणे जसे हे पृथ्वीवरी अवतरले
आनंद तरंगांचा तो अगम्य प्रहर
प्रेमसागराशी एकरूप ती भावनिक लहर
शब्दांपलिकडे बोलली आज ती बोलकी नजर
आठवण येता ती मन सहज शहारले
चांदणे जसे ते पृथ्वीवरी अवतरले
भेट ती क्षणिक परी सुखद
देऊन मुठीत तो आठवणींचा गंधप्रमोद
वेळ ती सुंदर निसटली जलद
घेता निरोप ते आनंद विश्व संथ झाकोळले
काही क्षण चांदणे आज पृथ्वीवरी अवतरले..
पंकज घुगे